The Philanthropist The Consultant The Socialist

Friday, 31 May 2019



माझ्या प्रिय भारतमाते,

                                हे भारतमाते सर्वात आधी मला माफ कर. कारण खूप दिवसातून मी आज तुझ्याशी बोलतोय. माझ्या धकाधकीच्या जीवनात मी तुला विसरत चाललो होतो. पैसे कमविणे आणि आयुष्याचा उपभोग घेणे यात मी व्यस्त होतो. तुझ्याशी बोलण्यासाठी मी काही मिनिटांचा पण वेळ काढू शकलो नाही. माझा परिवार बायको-मुले यांची खूप काळजी केली पण मला जागविणाऱ्या तुझ्याशी, भारतमातेशी बोलायला वेळ काढू शकलो नाही यासाठी मला माफ कर.
                                मला माहिती आहे कि तुझे मन खूप मोठे आहे आणि त्यामुळे तू या लेकराला तुझ्या पदरात घेशील. मी त्या लायकीचा नाही. पण मला तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. कितीही केले तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही. तू सर्व शक्तिमान आहेस. तुझ्यापुढे सर्व आदर्श फिके पडतील. पण तुझा आदर्श पुत्र बनण्याची मला संधी दे. माते, तुझ्या महान मुलांनी स्वातंत्र्यासाठी निस्वार्थीपणे स्वतःला मरणाच्या स्वाधीन केले. आणि आमची काहीनाकाही मागण्याची सवय जात नाही. पण मी आज माझ्यासाठी मागणार नाही. तुझ्या प्रियजनांसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मुलांसाठी मला काहीतरी करायचे आहे. तुला आनंदी बघण्यासाठी मला काहीतरी करायचे आहे. तू मला जीवन दिलेस, स्वातंत्र्य, अधिकार, अन्न, पाणी, जागा, ओळख व सर्वकाही दिले आहेस. तुझ्या सन्मानासाठी मी आज काहीही करायला तयार आहे. हे भारतमाते, मी आज तुला वाचन देतो कि, मी आजपासूनच काय आत्तापासूनच भ्रष्टाचार करणार नाही. इमानदारीने नीतिमत्तेने सर्व आयुष तुझ्या कुशीत व्यतीत करणार आहे.
भारतमाता पूजन 
                                आज पर्यावरणीय समस्या खूप वाढल्या आहेत. आम्ही लोकांनी सर्व जंगले नष्ट करीत आणली आहेत. कचरा, प्लास्टिक यामुळे अस्वच्छता होऊन खूप प्रदूषण वाढले आहे. यासाठी आम्ही लोकच सर्वस्वी जबाबदार आहोत. स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आम्ही डोंगरे खोदली. विकासाच्या नावावर आम्ही बेसुमार पाणी वापरून ते निरुपयोगी, प्रदूषित केले. तुझा हिरवागार निसर्गी शालू आम्ही मळवून ठेवला. पण तो हिरवा शालू पुन्हा तुझ्या अंगावर नेसवण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी माते, तुला मी वचन देतो कि, मी अस्वच्छता करणार नाही. प्लास्टिकचा वापर करणार नाही. झाडे न तोडता, झाडे लाऊन ती पुन्हा जगवण्याची हमी मी तुला देतो.
                                माते, तू तुझ्या सर्व लेकरांना समान वागणूक दिलीस.सर्वांना समान न्याय, सर्व व्यवस्था समान देऊन मोठ केलस. सर्वाना मुक्त स्वातंत्र्याचा आनंद दिलास. पण आम्ही स्वतःला आणि स्वतःच्या भावंडाना जात धर्म पाडून वेगळ केलं. मला हे सांगताना सुद्धा शरम वाटत आहे. आणि मला माहिती आहे हे सर्व पाहून तू उद्विग्न होत आहेस. तुझ्या लेकरांचे जाती-धर्माचे वेगळे संसार पाहून तुला खूप दुखः होत आहे. हि तुझी सर्व लेकरे ज्यावेळी जात-धर्म या नावावर भांडत असतात. स्वतःच्या भावा- बहिणींचा अपमान करून त्यांना त्रास देत असतात. त्यांचे खून करत असतात. त्यावेळी तू खूप रडतेस हे मी पाहत आहे. पण तू कायम गप्प राहतेस. तुझे दुखः आत दाबून सर्व निपुटपणे पाहत राहतेस. कोणालाही काहीही बोलत नाहीस, कोणालाही कठोर शिक्षा करत नाहीस. मला माहिती आहे कि तुझ्या मनात आल तर तू क्षणार्धातच सर्वांचा नाश करू शकतेस. पण तू तस करत नाहीस कारण तू एक आई आहेस. तुझ्याकडे आईच हृदय आहे, आणि आईच हृदय देवापेक्षा मोठ असते. त्यात फक्त प्रेम आणि त्यागच असतो. एक आई आपल्या मुलांसाठी फक्त चांगलच मागते. तू कधीही आपल्या मुलांना नुकसान पोहचवणार नाहीस. आणि म्हणून मी तुझा मुलगा आज तुला वचन देतो की, मी या जाती-धर्माच्या सीमारेषा मुजवून माझ्या सर्व भावंडाना मग ते हिंदू, मुस्लीम, शीख, खिर्श्चन वा कुठल्याही जाती-धर्म, पंतातील असोत त्यांना बरोबर घेऊन स्वतःचा आणि समजाचा उद्धार करीन. माते, मी आज शपथ घेतो कि, माझ्या भावंडाना सोबत घेऊन समाजाच्या विकासाठी, भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीन आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही असे वर्तन करीन.
                आणि आई, मी तुला वचन देतो कि, मी तुझा आदर्श पुत्र होईन. आई. माझ्या चुकांबद्दल मला पुनःश्च माफ कर.

                                                                                                         तुझा प्रिय पुत्र,


                                                                                                               प्रमोद महादेव मांडवे 


प्रजासत्ताक दिनी भारतमाता पूजन कार्यक्रम  


महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव 

शिवशक्ती आयोजित महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव २०१९ 

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शांतता रुजविण्यासाठी महापुरुषांचा संयुक्त जयन्ती उत्सव 

शिवशक्तीचे अध्यक्ष मा. प्रमोद मांडवे महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवात मार्गदर्शन करताना.



Sunday, 21 October 2018


शहीदांचे घर : राजगुरुवाडा, राजगुरूनगर-खेड

@ राजगुरू वाडा राजगुरूनगर (खेड) जि. पुणे  

न इज्जत दे,
न अजमत दे,
न सूरत दे,
न सीरत दे,
मेरे वतन के वास्ते, ए रब !
मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे !
                            
                असे म्हणत हसत-हसत स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या, शहिदांच्या घरी जावे त्यांच्या नातलगांना भेटावे. त्यांचा माहिती नसलेला, वास्तविक माहिती होऊ न दिलेला छुपा इतिहास जाणून घ्यावा. ज्या पवित्र स्थानी त्यांचा जन्म झाला, ज्या स्थानी क्रांतीची सुरवात झाली अश्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावे. त्याठिकाणी माथा टेकावा. अशी ओढ खूप दिवसापासून होती. पुण्याशेजारी राजगुरूनगर (खेड) आहे; जिथे शाहिद शिवराम राजगुरूंचे घर आहे. आम्ही राजगुरूनगर येथे राजगुरुवाड्यावर गेलो. शिवराम राजगुरू हे मूळचे ब्राह्माण कुटुंबातील होते. त्यांचे आडनाव ब्रह्मे होते, परंतु राजाश्रयामुळे त्यांना खेड येथे जागा मिळाली आणि राजाचे गुरू या अर्थी सर्वजण राजगुरू बोलू लागले. त्यावरून राजगुरू हे आडनाव पडले. अशी माहिती स्थानिक राजगुरूनगर नगरपालिका कर्मचारी सौ. शोभा यांनी दिली. राजगुरू वाडा हा २.५ एकरात विस्तारित होता. परंतु नंतर काही जागा विकल्याने सध्या तो एकरभर जागेत असावा. भीमा नदीच्या अगदी काठावरच हा राजगुरू वाडा आहे. पुणे-मंचर हायवे पुलापासून साधारणतः अर्ध्या किलोमीटर अंतरावर असेल. स्थानिक नगरपालिका राजगुरू वाड्याची चांगली देखभाल करीत आहे. परंतु अजून देखील संवर्धनाची गरज आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या या शहिदांना तुलनेने कमीच किंमत मिळाली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे या ठिकाणी आल्यावर दिसणाऱ्या भग्न अवस्थेतील वास्तूंवरून स्पष्ट दिसून येतेचं.

                         
शहीद राजगुरू यांचे जन्म घर (राजगुरुनगर (खेद) जि. पुणे)
राजगुरू वाड्याची बांधणी जुन्या दगडी विटात केली आहे. त्याच्या भिंती ३ फुटी आहेत. भव्यदिव्य अश्या वाड्यात गेल्यावर क्रांतीची मशाल येथूनच पेटल्याचे स्पष्ट भासते. छाती अभिमानाने भरून येते. राजगुरू हे ब्राह्मण कुटुंबातून होते. त्यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. परंतु राजगुरू मात्र याउलट स्वातंत्र्य, क्रांतीच्या बाजूने, विद्रोही विचारसरणीचे होते. राजगुरू यांचे वय जेमतेम १४ वर्षे होते. त्यावेळी पुणे-मंचर रस्त्यावरून इंग्रज ताफा निघाला होता.
या भीमा नदीवरील पुणे-मंचर पुलावरून इंग्रज ये जा करत होते. 
त्यावेळी राजगुरू यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला 
एक रस्तेकरू शेतकरी त्यांच्या गाडीच्या आडवा आला यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला बेदम मारले. हे सर्व पाहून राजगुरू उद्विग्न झाले आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला आणि ते कोणालाही न समजता गर्दीतून निघून गेले. राजगुरू हे अचूक नेमबाज होते. या प्रसंगानंतर राजगुरू यांच्या मनात इंग्रज सत्तेविरोधात बंड निर्माण होऊन हा क्रांतिकारक जन्माला आला. ब्राह्मण समाजात जन्म खोली वेगळी आणि आतल्या भागात असते. राजगुरु वाड्यात आपल्याला त्यांचे जन्मस्थळ खोली ही वाड्याच्या आत भीमा नदीच्या तीरावर पाहायला मिळेल. यातून आपल्याला त्याकाळी गर्भवती स्त्रीची किती काळजी घेतली जायची हे समजेल.
शहीद राजगुरू यांच्या
जन्म खोलीतील धान्याचे पेव 
या खोलीत अंदाजे २० फूट खोल असणारे धान्य पेव आहे. पूर्वीच्या काळी चोर आणि इंग्रज अधिकारी यांच्या लुटमारीतून वाचण्यासाठी धान्याचे कोठार हे जमिनीखाली खोदले जायचे आणि या ठिकाणी धान्य लपवून ठेवले जात होते. 

                  
शहीद राजगुरू यांची व्यायामशाळा जिची अवस्था बिकट असून
या वस्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे
.
त्याचबरोबर या ठिकाणी शहिद राजगुरू यांची व्यायामशाळा आहे. परंतु तिची अवस्था बिकट असून या इमारतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. या व्यायामशाळेतूनच गुप्त पद्धतीने नदीमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आम्हाला सौ. शोभा माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की, याठिकाणी शहिद दिन आणि राजगुरू यांची जयंती साजरी केली जाते. ज्यादिवशी राजगुरू यांना फाशी झाली म्हणजे २३ मार्चला २२ मार्चच्या मध्यरात्री संपूर्ण राजगुरूनगर हे जागे असते आणि गावातील संपूर्ण लाईट घालवली जाते. सर्व ठिकाणी मशाली पेटवल्या जातात. हे ऐकत असताना आम्ही या प्रसंगाची आणि राजगुरू यांना झालेल्या फाशीची कल्पना करत होतो. माझ्या अंगावर शहारे येत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना लाहोर येथे फाशी दिल्यावर त्यांची प्रेतं इंग्रजांनी दहन केल्याच्या ठिकाणची माती कलश या ठिकाणी आहे. त्याचे दर्शन घेऊन आम्ही या वीरांना श्रद्धांजली वाहिली. राजगुरू वाड्यात अनेक क्रांतिकारकांचे खरे फोटो आहेत.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या
समाधी स्थळावरील पवित्र माती 
                 याठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ते म्हणजे सती जाणाऱ्या महिलांची समाधी. भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाड्यालगत हिंदू धर्मातील सर्वात अनिष्ठ प्रथा-सतीप्रथा. पती स्वर्गवासी झाल्यावर त्याच्या अग्निकुंडात उडी मारून स्वतःला दहन करून घेणे म्हणजे सती जाणे. अश्या अनेक महिला या ठिकाणी सती गेल्या आहेत. त्यांची नावे या कुंडावर आहेत. हे समाधी स्थळ हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. 
हाच तो सतीकुंड ज्यावर अनेक स्त्रियांनी
पतीच्या अग्नीत स्वतःला दहन करून घेतले आहे.
या विरस्थळी एक उणीव जाणवली ती म्हणजे शहीद राजगुरू यांच्या वस्तू. शासनाने लक्ष घालून याठिकाणी त्यांच्या वस्तू आणून जतन करून ठेवायला पाहिजेत. पण एकूण सर्व परिस्थितीकडे पाहून असे लक्षात येते की, शासन याबाबतीत फार उदासीन आहे. स्थानिक नगरपालिकेने सुयोग्य संवर्धन आणि व्यवस्थापन केले आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शिवराम राजगुरूंचा विसर पडलाय असे वाटते. २०१४ च्या निवडणुकांवेळी याठिकाणी अमित शाह आले होते. त्याचबरोबर निवडणुका लागल्या की आमदार, खासदार, मंत्री येत असतात मोठमोठी आश्वासने देत असतात. पण कोणीही या वीरांच्या घराचे, पवित्र स्थळाचे संवर्धन व्हावे यासाठी निधी देत नाही अथवा प्रयत्नही करत नाही. एकूणच काय यामागचे राजकारण एवढेच की, या वीरांनी कधीही स्वातंत्र्याचं श्रेय घेतलं नाही किंवा मागण्या अगोदरच ते विरगतीला प्राप्त झाले. म्हणून आत्ताची व्यवस्था त्यांना जास्त मान-सन्मान मिळू नये यासाठी त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचू देत नाही. पण यांना माहिती नाही की, अजूनही भारतातील सर्वसामान्य लोकांच्या मनातले हिरो शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूच आहेत आणि कायमस्वरूपी राहतील. राजगुरुवाडा हे काही टुरिस्ट प्लेस नाही तर हे प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे प्रार्थना स्थळ, देवाचे ठिकाण आहे असे मला वाटते. आम्हाला मात्र याठिकाणी येऊन प्रचंड अभिमान, गर्व आणि आत्मविश्वास निर्माण झाला. हे स्वाभाविक होत कारण आम्ही शहिदांच्या घरी होतो.
                शिवराम राजगुरू यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. त्यांचा मृत्यू प्लेगच्या साथीने झाला त्यानंतर राजगुरू यांचे भाऊ इंग्रजांच्यात नोकरीला होते. प्रचंड पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा असतानासुद्धा फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी शहिद राजगुरू यांनी निस्वार्थी बलिदान दिले. आणि देशातील सध्याची यंत्रणा आणि काही विद्यालये यांच्या पुस्तकातून या शहिदांना आतंकवादी असे संबोधन दिले आहे. या हरामखोर औलादिंना या शहिदांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही. पण वाईट वाटते ते या व्यवस्थेचं. लोकशाही-लोकशाही म्हणत सत्ता हस्तगत केली. आणि या वीरांना इतिहासात मुजवण्याचा प्रयत्न केला. पण या शहीदांचं बलिदान, कार्य कधीही भारतीयांच्या मनातून जाणार नाही याची मला खात्री आहे. 
             या लेखाच्या निमित्ताने माझे आपणास आव्हान आहे कि, आपणसुद्धा आपला किंमती वेळ हा इतर ठिकाणी मौज-मजा करण्यात न घालवता या शहीद परिवारांच्या घरी जाऊन अभिमान, गर्व आणि प्रचंड आत्मविश्वासाची अनुभूती घ्यावी. आपल्या मुला-बाळांना शहिदांच्या इतिहासाची आठवण करून द्यावी जेणेकरून या ताण-तणावाच्या जीवनात ते कधीही हताश आणि अपयशी होऊन वाईट पाउल उचलणार नाहीत. आपण या शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्म स्थळाला भेट द्याल हीच अपेक्षा.

                                                               आपलाच,
                                                     प्रमोद महादेव मांडवे
                                          संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह 

राजगुरू वाड्यातील थोरला वाडा यामधील बैठक खोली 
राजगुरू वाडा 
राजगुरू वाड्यातील थोरला वाडा 
राजगुरू वाडा पाठीमागील बाजूने 

Friday, 19 October 2018




शिवशक्ती दिनदर्शिका : दिनदर्शिका नाही भविष्य आपल्या हातात


                             २०११/१२ साल हे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होते. आपण ज्यावेळी आपल्या ऐन तारुण्यात असतो. त्यावेळी आपण वारंवार भटकत असतो. वेगवेगळ्या सुंदर गोष्टींकडे आकर्षित होत असतो. वास्तविक ती सुंदर गोष्ट नसून आयुष्य बरबाद करनारा बॉम्ब असतो. पण हे वयच अस असत जिथे काहीच सुचत नाही. मी पण या वयात भरपूर भटकलो. बेचैन पक्षी जसा या डहाळी वरून त्या डहाळी वर सारखा उठ बस करत असतो. तसा मी या क्षेत्रातून त्या क्षेत्रात जात होतो. अश्यावेळी आपल्याला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. मी आणि माझा मोठा भाऊ विकास मांडवे नानीज येथे स्वामी नरेंद्रनाथ महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. मला पहिल्यांदा असल्या गोष्टीवर विश्वास न्हवता. आणि वास्तविक भगवी कपडे घालणारा भोंदू, बुवा असे सर्वसामान्य मत असते. परंतु वास्तविकता फार वेगळी आहे.
शिवशक्ती दिनदर्शिका २०१६ 
                माझे चुलते कै. अधिकभाऊ यांची स्वामींच्यावर खूप श्रद्धा होती. त्यांच्या आग्रहास्तव आणि मजा करण्यासाठी आम्ही नानीज येथे गेलो. तिथे महाराजांना आपल्या शंका विचारायची पद्धत होती. खूप लोक रांग लावून वेगवेगळ्या शंकांचे समाधान महाराजांकडून ऐकण्यास बसले होते. कोणाचे कौटुंबिक प्रश्न तर कुणाचे आर्थिक असे अनेक प्रश्न होते. माझा नंबर आला मी महाराजांना चिठ्ठीतून लिहलेला प्रश्न विचारला. महाराज, मला खूप मोठे व्हायचे आहे. पण काय करावे, कस करावं हे मला समजत नाही. यावर महाराजांनी मला जे उत्तर दिले त्यामुळे माझ्यात वैचारिक बदल झाले. महाराज म्हणाले, बाळा तु मोठी माणसे बघितली अशचिल. पण त्यांचे कार्य, दिवसाचे वेळेचे नियोजन बघितले आहेस काय? मी म्हणालो नाही. त्यांनी सांगितले अश्या मोठ्या व्यक्तींची ध्येय, उद्दीष्ठे आणि वेळेचं नियोजन हे आधीच ठरलेले असतं. आणि हे ठरवण्यासाठी, नियोजनासाठी त्यांच्याकडे नियोजन करणारी माणसे व्यक्ती, पी.ए असतात. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं नियोजन करतात. ते दिवसात कुठे जाणार, किती वेळ थांबणार अगदी काटेकोर नियोजन करतात आणी ते पाळतात. आपण आपल्या आयुष्याचे कोणत्याच गोष्टीच नियोजन करत नाही. तू तुझ्या आयुष्याचं नियोजन कर तुला जे व्हाचंय तू शंभर टक्के होशील. हे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत.
शिवशक्ती दिनदर्शिका २०१७ 
                        मी सारखा या गोष्टींचा, कायमचे नियोजन करण्याचा विचार करत होतो. त्यावेळी मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. शालेय जीवनात अभ्यासाचे, खेळाचे नियोजन करण्यासाठी मी दिनदर्शिकेचे वापर करायचो. तसेच घरातील मोठी मंडळी सुद्धा महत्वाची कामे, भविष्यकालीन योजना आणि संकल्पना आदी दिनदर्शिकेत नोंदी ठेवत होते. त्याचबरोबर नाणीज मठाची दिनदर्शिका आणि कार्यक्रम यांचे नियोजनही वर्षभर आधीच केलेले असते. मी ही युक्ती पुन्हा वापरायचे ठरवले. मी माझी महत्वाची कामे आणि संकल्पना यांचे नियोजन करून दिनदर्शिकेत लिहून ठेऊ लागलो. आणि एक वर्षात माझ्या लक्षात आले की, मी त्या वर्षात ठेवलेली ध्येय आणि त्याचे नियोजन हे जवळजवळ १०० टक्के यशस्वी झाले होते. मग एक दिवस अमोल वंडे जे माझे जवळचे मित्र आहेत ते ना नफा ना तोटा तत्वावर कृष्णाकाठ दिनदर्शिका छापत होते. आणि मग आम्हीपण शिवशक्ती दिनदर्शिका ना नफा ना तोटा तत्वावर, जाहिरात संकलानातून छापण्याचा निर्णय घेतला. आमचा उद्देश स्पष्ट आणि निस्वार्थी होता. शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून लोकांना त्यांचा आयुष्याचे, भविष्याचे नियोजन करण्याची सवय लावणे हा मुख्य उद्देश. म्हणूनच शिवशक्ती दिनदर्शिकेचे ब्रीद वाक्य आहे, ' दिनदर्शिका नाही भविष्य आपल्या हातात '. त्याचबरोबर स्थानिक व्यवसाय व उद्योजक
शिवशक्ती दिनदर्शिका २०१८ 

यांना जाहिरातीसाठी प्रभावी व दीर्घ कालावधीचे माध्यम उपलब्ध करून त्याला सामाजिक उपक्रमाची जोड देणे या उद्देशात आम्ही शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सफल झालो आहोत. शिवशक्ती दिनदर्शिका ही ११,००० घरात मोफत जात असल्याने तसेच वर्षभर घरी राहत असल्याने शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून जवळपास १ लक्ष लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहचून आपले आपल्या व्यवसायाचे विपणन होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर या ११,००० लोकांना शिवशक्ती दिनदर्शिका मोफत मिळत असल्याने नवी दिनदर्शिका घ्यावी लागत नाही त्यामुळे या सर्व कुटुंबाचा एकूण ३ लक्ष रुपयांचा फायदा होत आहे. हा पण, या मोफत संकल्पनेमुळे ज्यांचा दिनदर्शिका छपाई व विक्रीचा व्यवसाय आहे त्यांनी आम्हाला त्रास दिला. पण हा व्यवसाय नसून सर्व सामाजिक कार्य असल्याने आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही. यंदाचे आमचे हे सहावे वर्ष असून सन २०१५ साली प्रथम १,००० दिनदर्शिका आम्ही मोफत वितरित केल्या होत्या. तदनंतर आज रोजी ११,००० पर्यंतचा विक्रमी टप्पा आम्ही गाठला आहे. यासाठी आमच्यावर विश्वास ठेवून व सामाजिक जबाबदारी ओळखून जाहिरात देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आणि शिवशक्ती दिनदर्शिकेसाठी सर्वोत्तपरी आर्थिक, मानसिक आणि भौतिक सहकार्य करणाऱ्या लोकांचे योगदान अनमोल आहे.

         पण आता जबाबदारी वाढत आहे. आपण चालू केलेला सामाजिक यज्ञ थांबून न देण्याची
शिवशक्ती दिनदर्शिका २०१९ 
जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचलित ' शिवशक्ती दिनदर्शिका ' ११,००० प्रतींचे मोफत वितरण हे ७ वे वर्ष आहे. ही सात वर्षे संस्थेच्या सामाजिक उपक्रमास सहकार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती, मान्यवर, व सर्व नागरिकांच्या त्यागाची व समाधानाची सहा वर्षे आहेत असे आमचे म्हणणे आहे. सदर शिवशक्ती दिनदर्शिका या उपक्रमाकडे फक्त जाहिरात म्हणून न पाहता एक भविष्यकालीन गुंतवणूक व सामाजिक जबाबदारी या दृष्टिकोनातून पहावे व आपल्या संस्थेची, व्यवसायाची, वाढदिवस, शुभेच्छा यांची जाहिरात देऊन सामाजिक कार्यास हातभार लावावा ही नम्र विनंती.

                                                                                                                                                                                         

                                                                      आपलाच,
                                                           प्रमोद महादेव मांडवे
                                         संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती सोशल फौंडेशन



शिवशक्ती दिनदर्शिका २०२० 




: जाहीरातीसाठी संपर्क : 

८९७५३०७४७०,९६७३३७१७८५ , ९६९००९८२६५ 




११,००० शिवशक्ती दिनदर्शिका मोफत वितरण करण्यात आलेल्या शाळ



ü मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या शाळा कडेगांव
ü महात्मा गांधी विद्यालय, कडेगांव
ü न्यू सेकंडरी स्कूल, नेर्ली
ü श्री शिवछत्रपती विद्यालय, शिवाजीनगर
ü मुकुंदराज विद्यालय, शाळगांव
ü जिल्हा परिषद शाळा, शाळगांव
ü जिल्हा परिषद शाळा, अपशिंगे
ü शासकीय आय.टी.आय. कडेगांव
ü जिल्हा परिषद शाळा, बेलवडे
ü जिल्हा परिषद शाळा, बोंबाळेवाडी
ü जिल्हा परिषद शाळा, हिंगणगांव खुर्द
ü जिल्हा परिषद शाळा नं १ खंबाळे औंध
ü जिल्हा परिषद शाळा नं. २ खंबाळे औंध
ü जिल्हा परिषद शाळा, कोतवडे
ü जिल्हा परिषद शाळा, निमसोड
ü जिल्हा परिषद शाळा, तडसर
ü तात्या रावजी विद्यालय, तडसर
ü जिल्हा परिषद शाळा, रायगाव
ü जिल्हा परिषद शाळा, विहापूर
ü जिल्हा परिषद शाळा, रेनुशेवाडी
ü अभिजित दादा कदम विद्यालय, अमरापूर
ü जिल्हा परिषद शाळा, येडे-उपाळे
ü भारती विद्यापीठ, सोहोली
ü जिल्हा परिषद शाळा, हणमंत वडीये  



शिवशक्ती दिनदर्शिका २०२० चे प्रकाशन बहुजन नेते एम.एम.नाना मदने, सांगली जि.प. चे सभापती ब्रह्मानंद पडळकर व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. 



शिवशक्ती दिनदर्शिका २०१९ चे प्रकाशन मा. गोपीचंद पडळकर साहेब व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.





११००० शिवशक्ती दिनदर्शिका मोफत वितरण