The Philanthropist The Consultant The Socialist

Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

Sunday, 21 October 2018


शहीदांचे घर : राजगुरुवाडा, राजगुरूनगर-खेड

@ राजगुरू वाडा राजगुरूनगर (खेड) जि. पुणे  

न इज्जत दे,
न अजमत दे,
न सूरत दे,
न सीरत दे,
मेरे वतन के वास्ते, ए रब !
मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे !
                            
                असे म्हणत हसत-हसत स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या, शहिदांच्या घरी जावे त्यांच्या नातलगांना भेटावे. त्यांचा माहिती नसलेला, वास्तविक माहिती होऊ न दिलेला छुपा इतिहास जाणून घ्यावा. ज्या पवित्र स्थानी त्यांचा जन्म झाला, ज्या स्थानी क्रांतीची सुरवात झाली अश्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावे. त्याठिकाणी माथा टेकावा. अशी ओढ खूप दिवसापासून होती. पुण्याशेजारी राजगुरूनगर (खेड) आहे; जिथे शाहिद शिवराम राजगुरूंचे घर आहे. आम्ही राजगुरूनगर येथे राजगुरुवाड्यावर गेलो. शिवराम राजगुरू हे मूळचे ब्राह्माण कुटुंबातील होते. त्यांचे आडनाव ब्रह्मे होते, परंतु राजाश्रयामुळे त्यांना खेड येथे जागा मिळाली आणि राजाचे गुरू या अर्थी सर्वजण राजगुरू बोलू लागले. त्यावरून राजगुरू हे आडनाव पडले. अशी माहिती स्थानिक राजगुरूनगर नगरपालिका कर्मचारी सौ. शोभा यांनी दिली. राजगुरू वाडा हा २.५ एकरात विस्तारित होता. परंतु नंतर काही जागा विकल्याने सध्या तो एकरभर जागेत असावा. भीमा नदीच्या अगदी काठावरच हा राजगुरू वाडा आहे. पुणे-मंचर हायवे पुलापासून साधारणतः अर्ध्या किलोमीटर अंतरावर असेल. स्थानिक नगरपालिका राजगुरू वाड्याची चांगली देखभाल करीत आहे. परंतु अजून देखील संवर्धनाची गरज आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या या शहिदांना तुलनेने कमीच किंमत मिळाली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे या ठिकाणी आल्यावर दिसणाऱ्या भग्न अवस्थेतील वास्तूंवरून स्पष्ट दिसून येतेचं.

                         
शहीद राजगुरू यांचे जन्म घर (राजगुरुनगर (खेद) जि. पुणे)
राजगुरू वाड्याची बांधणी जुन्या दगडी विटात केली आहे. त्याच्या भिंती ३ फुटी आहेत. भव्यदिव्य अश्या वाड्यात गेल्यावर क्रांतीची मशाल येथूनच पेटल्याचे स्पष्ट भासते. छाती अभिमानाने भरून येते. राजगुरू हे ब्राह्मण कुटुंबातून होते. त्यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. परंतु राजगुरू मात्र याउलट स्वातंत्र्य, क्रांतीच्या बाजूने, विद्रोही विचारसरणीचे होते. राजगुरू यांचे वय जेमतेम १४ वर्षे होते. त्यावेळी पुणे-मंचर रस्त्यावरून इंग्रज ताफा निघाला होता.
या भीमा नदीवरील पुणे-मंचर पुलावरून इंग्रज ये जा करत होते. 
त्यावेळी राजगुरू यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला 
एक रस्तेकरू शेतकरी त्यांच्या गाडीच्या आडवा आला यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला बेदम मारले. हे सर्व पाहून राजगुरू उद्विग्न झाले आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला आणि ते कोणालाही न समजता गर्दीतून निघून गेले. राजगुरू हे अचूक नेमबाज होते. या प्रसंगानंतर राजगुरू यांच्या मनात इंग्रज सत्तेविरोधात बंड निर्माण होऊन हा क्रांतिकारक जन्माला आला. ब्राह्मण समाजात जन्म खोली वेगळी आणि आतल्या भागात असते. राजगुरु वाड्यात आपल्याला त्यांचे जन्मस्थळ खोली ही वाड्याच्या आत भीमा नदीच्या तीरावर पाहायला मिळेल. यातून आपल्याला त्याकाळी गर्भवती स्त्रीची किती काळजी घेतली जायची हे समजेल.
शहीद राजगुरू यांच्या
जन्म खोलीतील धान्याचे पेव 
या खोलीत अंदाजे २० फूट खोल असणारे धान्य पेव आहे. पूर्वीच्या काळी चोर आणि इंग्रज अधिकारी यांच्या लुटमारीतून वाचण्यासाठी धान्याचे कोठार हे जमिनीखाली खोदले जायचे आणि या ठिकाणी धान्य लपवून ठेवले जात होते. 

                  
शहीद राजगुरू यांची व्यायामशाळा जिची अवस्था बिकट असून
या वस्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे
.
त्याचबरोबर या ठिकाणी शहिद राजगुरू यांची व्यायामशाळा आहे. परंतु तिची अवस्था बिकट असून या इमारतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. या व्यायामशाळेतूनच गुप्त पद्धतीने नदीमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आम्हाला सौ. शोभा माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की, याठिकाणी शहिद दिन आणि राजगुरू यांची जयंती साजरी केली जाते. ज्यादिवशी राजगुरू यांना फाशी झाली म्हणजे २३ मार्चला २२ मार्चच्या मध्यरात्री संपूर्ण राजगुरूनगर हे जागे असते आणि गावातील संपूर्ण लाईट घालवली जाते. सर्व ठिकाणी मशाली पेटवल्या जातात. हे ऐकत असताना आम्ही या प्रसंगाची आणि राजगुरू यांना झालेल्या फाशीची कल्पना करत होतो. माझ्या अंगावर शहारे येत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना लाहोर येथे फाशी दिल्यावर त्यांची प्रेतं इंग्रजांनी दहन केल्याच्या ठिकाणची माती कलश या ठिकाणी आहे. त्याचे दर्शन घेऊन आम्ही या वीरांना श्रद्धांजली वाहिली. राजगुरू वाड्यात अनेक क्रांतिकारकांचे खरे फोटो आहेत.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या
समाधी स्थळावरील पवित्र माती 
                 याठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ते म्हणजे सती जाणाऱ्या महिलांची समाधी. भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाड्यालगत हिंदू धर्मातील सर्वात अनिष्ठ प्रथा-सतीप्रथा. पती स्वर्गवासी झाल्यावर त्याच्या अग्निकुंडात उडी मारून स्वतःला दहन करून घेणे म्हणजे सती जाणे. अश्या अनेक महिला या ठिकाणी सती गेल्या आहेत. त्यांची नावे या कुंडावर आहेत. हे समाधी स्थळ हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. 
हाच तो सतीकुंड ज्यावर अनेक स्त्रियांनी
पतीच्या अग्नीत स्वतःला दहन करून घेतले आहे.
या विरस्थळी एक उणीव जाणवली ती म्हणजे शहीद राजगुरू यांच्या वस्तू. शासनाने लक्ष घालून याठिकाणी त्यांच्या वस्तू आणून जतन करून ठेवायला पाहिजेत. पण एकूण सर्व परिस्थितीकडे पाहून असे लक्षात येते की, शासन याबाबतीत फार उदासीन आहे. स्थानिक नगरपालिकेने सुयोग्य संवर्धन आणि व्यवस्थापन केले आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शिवराम राजगुरूंचा विसर पडलाय असे वाटते. २०१४ च्या निवडणुकांवेळी याठिकाणी अमित शाह आले होते. त्याचबरोबर निवडणुका लागल्या की आमदार, खासदार, मंत्री येत असतात मोठमोठी आश्वासने देत असतात. पण कोणीही या वीरांच्या घराचे, पवित्र स्थळाचे संवर्धन व्हावे यासाठी निधी देत नाही अथवा प्रयत्नही करत नाही. एकूणच काय यामागचे राजकारण एवढेच की, या वीरांनी कधीही स्वातंत्र्याचं श्रेय घेतलं नाही किंवा मागण्या अगोदरच ते विरगतीला प्राप्त झाले. म्हणून आत्ताची व्यवस्था त्यांना जास्त मान-सन्मान मिळू नये यासाठी त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचू देत नाही. पण यांना माहिती नाही की, अजूनही भारतातील सर्वसामान्य लोकांच्या मनातले हिरो शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूच आहेत आणि कायमस्वरूपी राहतील. राजगुरुवाडा हे काही टुरिस्ट प्लेस नाही तर हे प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे प्रार्थना स्थळ, देवाचे ठिकाण आहे असे मला वाटते. आम्हाला मात्र याठिकाणी येऊन प्रचंड अभिमान, गर्व आणि आत्मविश्वास निर्माण झाला. हे स्वाभाविक होत कारण आम्ही शहिदांच्या घरी होतो.
                शिवराम राजगुरू यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. त्यांचा मृत्यू प्लेगच्या साथीने झाला त्यानंतर राजगुरू यांचे भाऊ इंग्रजांच्यात नोकरीला होते. प्रचंड पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा असतानासुद्धा फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी शहिद राजगुरू यांनी निस्वार्थी बलिदान दिले. आणि देशातील सध्याची यंत्रणा आणि काही विद्यालये यांच्या पुस्तकातून या शहिदांना आतंकवादी असे संबोधन दिले आहे. या हरामखोर औलादिंना या शहिदांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही. पण वाईट वाटते ते या व्यवस्थेचं. लोकशाही-लोकशाही म्हणत सत्ता हस्तगत केली. आणि या वीरांना इतिहासात मुजवण्याचा प्रयत्न केला. पण या शहीदांचं बलिदान, कार्य कधीही भारतीयांच्या मनातून जाणार नाही याची मला खात्री आहे. 
             या लेखाच्या निमित्ताने माझे आपणास आव्हान आहे कि, आपणसुद्धा आपला किंमती वेळ हा इतर ठिकाणी मौज-मजा करण्यात न घालवता या शहीद परिवारांच्या घरी जाऊन अभिमान, गर्व आणि प्रचंड आत्मविश्वासाची अनुभूती घ्यावी. आपल्या मुला-बाळांना शहिदांच्या इतिहासाची आठवण करून द्यावी जेणेकरून या ताण-तणावाच्या जीवनात ते कधीही हताश आणि अपयशी होऊन वाईट पाउल उचलणार नाहीत. आपण या शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्म स्थळाला भेट द्याल हीच अपेक्षा.

                                                               आपलाच,
                                                     प्रमोद महादेव मांडवे
                                          संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह 

राजगुरू वाड्यातील थोरला वाडा यामधील बैठक खोली 
राजगुरू वाडा 
राजगुरू वाड्यातील थोरला वाडा 
राजगुरू वाडा पाठीमागील बाजूने