हुमणी नियंत्रणाचे उपाय
हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.