The Philanthropist The Consultant The Socialist

Friday, 31 May 2019



माझ्या प्रिय भारतमाते,

                                हे भारतमाते सर्वात आधी मला माफ कर. कारण खूप दिवसातून मी आज तुझ्याशी बोलतोय. माझ्या धकाधकीच्या जीवनात मी तुला विसरत चाललो होतो. पैसे कमविणे आणि आयुष्याचा उपभोग घेणे यात मी व्यस्त होतो. तुझ्याशी बोलण्यासाठी मी काही मिनिटांचा पण वेळ काढू शकलो नाही. माझा परिवार बायको-मुले यांची खूप काळजी केली पण मला जागविणाऱ्या तुझ्याशी, भारतमातेशी बोलायला वेळ काढू शकलो नाही यासाठी मला माफ कर.
                                मला माहिती आहे कि तुझे मन खूप मोठे आहे आणि त्यामुळे तू या लेकराला तुझ्या पदरात घेशील. मी त्या लायकीचा नाही. पण मला तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. कितीही केले तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही. तू सर्व शक्तिमान आहेस. तुझ्यापुढे सर्व आदर्श फिके पडतील. पण तुझा आदर्श पुत्र बनण्याची मला संधी दे. माते, तुझ्या महान मुलांनी स्वातंत्र्यासाठी निस्वार्थीपणे स्वतःला मरणाच्या स्वाधीन केले. आणि आमची काहीनाकाही मागण्याची सवय जात नाही. पण मी आज माझ्यासाठी मागणार नाही. तुझ्या प्रियजनांसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मुलांसाठी मला काहीतरी करायचे आहे. तुला आनंदी बघण्यासाठी मला काहीतरी करायचे आहे. तू मला जीवन दिलेस, स्वातंत्र्य, अधिकार, अन्न, पाणी, जागा, ओळख व सर्वकाही दिले आहेस. तुझ्या सन्मानासाठी मी आज काहीही करायला तयार आहे. हे भारतमाते, मी आज तुला वाचन देतो कि, मी आजपासूनच काय आत्तापासूनच भ्रष्टाचार करणार नाही. इमानदारीने नीतिमत्तेने सर्व आयुष तुझ्या कुशीत व्यतीत करणार आहे.
भारतमाता पूजन 
                                आज पर्यावरणीय समस्या खूप वाढल्या आहेत. आम्ही लोकांनी सर्व जंगले नष्ट करीत आणली आहेत. कचरा, प्लास्टिक यामुळे अस्वच्छता होऊन खूप प्रदूषण वाढले आहे. यासाठी आम्ही लोकच सर्वस्वी जबाबदार आहोत. स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आम्ही डोंगरे खोदली. विकासाच्या नावावर आम्ही बेसुमार पाणी वापरून ते निरुपयोगी, प्रदूषित केले. तुझा हिरवागार निसर्गी शालू आम्ही मळवून ठेवला. पण तो हिरवा शालू पुन्हा तुझ्या अंगावर नेसवण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी माते, तुला मी वचन देतो कि, मी अस्वच्छता करणार नाही. प्लास्टिकचा वापर करणार नाही. झाडे न तोडता, झाडे लाऊन ती पुन्हा जगवण्याची हमी मी तुला देतो.
                                माते, तू तुझ्या सर्व लेकरांना समान वागणूक दिलीस.सर्वांना समान न्याय, सर्व व्यवस्था समान देऊन मोठ केलस. सर्वाना मुक्त स्वातंत्र्याचा आनंद दिलास. पण आम्ही स्वतःला आणि स्वतःच्या भावंडाना जात धर्म पाडून वेगळ केलं. मला हे सांगताना सुद्धा शरम वाटत आहे. आणि मला माहिती आहे हे सर्व पाहून तू उद्विग्न होत आहेस. तुझ्या लेकरांचे जाती-धर्माचे वेगळे संसार पाहून तुला खूप दुखः होत आहे. हि तुझी सर्व लेकरे ज्यावेळी जात-धर्म या नावावर भांडत असतात. स्वतःच्या भावा- बहिणींचा अपमान करून त्यांना त्रास देत असतात. त्यांचे खून करत असतात. त्यावेळी तू खूप रडतेस हे मी पाहत आहे. पण तू कायम गप्प राहतेस. तुझे दुखः आत दाबून सर्व निपुटपणे पाहत राहतेस. कोणालाही काहीही बोलत नाहीस, कोणालाही कठोर शिक्षा करत नाहीस. मला माहिती आहे कि तुझ्या मनात आल तर तू क्षणार्धातच सर्वांचा नाश करू शकतेस. पण तू तस करत नाहीस कारण तू एक आई आहेस. तुझ्याकडे आईच हृदय आहे, आणि आईच हृदय देवापेक्षा मोठ असते. त्यात फक्त प्रेम आणि त्यागच असतो. एक आई आपल्या मुलांसाठी फक्त चांगलच मागते. तू कधीही आपल्या मुलांना नुकसान पोहचवणार नाहीस. आणि म्हणून मी तुझा मुलगा आज तुला वचन देतो की, मी या जाती-धर्माच्या सीमारेषा मुजवून माझ्या सर्व भावंडाना मग ते हिंदू, मुस्लीम, शीख, खिर्श्चन वा कुठल्याही जाती-धर्म, पंतातील असोत त्यांना बरोबर घेऊन स्वतःचा आणि समजाचा उद्धार करीन. माते, मी आज शपथ घेतो कि, माझ्या भावंडाना सोबत घेऊन समाजाच्या विकासाठी, भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीन आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही असे वर्तन करीन.
                आणि आई, मी तुला वचन देतो कि, मी तुझा आदर्श पुत्र होईन. आई. माझ्या चुकांबद्दल मला पुनःश्च माफ कर.

                                                                                                         तुझा प्रिय पुत्र,


                                                                                                               प्रमोद महादेव मांडवे 


प्रजासत्ताक दिनी भारतमाता पूजन कार्यक्रम  


महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव 

शिवशक्ती आयोजित महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव २०१९ 

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शांतता रुजविण्यासाठी महापुरुषांचा संयुक्त जयन्ती उत्सव 

शिवशक्तीचे अध्यक्ष मा. प्रमोद मांडवे महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवात मार्गदर्शन करताना.